महागाई बेरोजगारी चा वार, सामान्यांनी जगायचं कसं सरकार?
( शासकीय धोरणाच्या केंद्रस्थानी सर्वसामान्य नाही )
राळेगाव / तालुका प्रतिनिधि विलास साखरकर(8208260998)
राळेगाव तालुक्यावर यंदा आस्मानी संकटाचा कहर अतिवृष्टीचे रूप घेऊन बरसला. तब्बल 12 गावे पाण्याखाली गेली. नापिकीचे स्पष्ट संकेत असतांना केंद्राने कापूस आयातीवरील 11 टक्के कर रद्द केला. या मुळे कापसाचे भाव गडगडले. शेतकरी हवालदिल झाला. शेतकर्यांना मदतीची गरज असतांना नेमके उलटे पाऊल उचलायचे हा शासनाच्या धोरणांचा प्राधान्यक्रम झाल्याचे हे एक उदाहरण, मात्र हे अपवादात्मक उदाहरण नाही. शासनाच्या अनेक निर्णयाने हाच कित्ता गिरवला आहे. शासकीय धोरणाच्या केंद्रस्थानी सामान्य माणूस नाहीच किंबहुना त्याचे वाटोळे कसे होईल हाच शासकीय धोरणांचा प्राधान्यक्रम असल्याची खात्री पटावी असे निर्णय रोज घेतल्या जात आहे.
मराठी शाळा दर्जेदार शिक्षण देऊ शकतं नाही. हजारो शिक्षकांची पदे रिक्त आहे. जिथे शिक्षक कार्यरत आहेत त्यांना शिकवू देण्यात येतं नाही. माहितीच्या नावाचे कागदी घोडे सुसाट वेगाने त्या शिक्षकांवर रोज येऊन आदळतात. धोरणंकर्ते यावर चकारशब्द बोलत नाही . उलट कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याची मागणी पुढे केल्या जाते. दुसरीकडे मुंबई येथे मराठी भाषेला उर्जितावस्था देण्यासाठी विश्व् मराठी साहित्य संमेलन घेतल्या जाते. त्या खुर्च्यांवर कुणी बसायला तयार नाही. या संमेलनाचे फुकट पास देऊनही गर्दी जमत नाही. मराठी शाळा बंद करून मराठीला उर्जितावस्था कशी येणार ? याचे सोयर-सुतक कुणाला नाही. वांझोटे मराठी संमेलन घेऊन मराठी भाषा संप्पन होणार नाही त्या साठी ही भाषा शिकविणाऱ्या मराठी शाळा सक्षम कराव्या लागतील, हे सांगायचे कुणी ?
शिक्षण क्षेत्रातील हा विरोधाभास समोर येतं नाही तर दुसरीकडे शासनाच्या उद्योग धोरणातील विसंगतीने तोंड वर काढले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ सिंदे मंत्र्यासह दावोस येथे रवानाझाले .विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांचा दौरा असल्याचे सांगितले गेलें. नेमके त्याच कालावधीत उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात येऊन उद्योगपतींना उत्तरप्रदेश मध्ये चला म्हणण्यासाठी मुंबईत बैठका घेत आहेत. आणि महाराष्ट्रातले उद्योग गुजरात मध्ये जात आहेत. हा खो पाठी खो खेळ सुरु असतांना नेमके कुणाला काय मिळवायचे आहे. याचा अंदाजच बांधता येतं नाही.
हे होतं असतांना घरचं होतं थोड अन व्याह्यान धाडलं घोड असं एक आक्रीत पुन्हा समोर आलं. विद्यापीठ अनुदान आयोगाने परदेशी विद्यापीठांना देशात मुक्तद्वार प्रवेश दिला. विशेष म्हणजे या परदेशी विद्यापीठांनी कोणते अभ्यासक्रम शिकवायचे, कुणाला प्रवेश द्यायचे, प्राध्यापक निवड प्रक्रिया कशी राबवायची आणि शुल्क किती घ्यायचे यावर कुणाला आक्षेप घ्यायची मुभा नाही. या मुळे शिक्षण क्षेत्रात आता परदेशी विधापीठ पुढील काळात धुमाकूळ घालताना दिसेल. यातही विरोधात असताना काँग्रेस ने या स्वरूपाचा निर्णय घेतला तेव्हा भाजपा ने या निर्णयाला कडाडून विरोध केला होता. सत्तेत येताच मात्र परदेशी विद्यापीठांना पायघड्या घालण्याचे कामं केंद्राने केले.
विसंगत धोरणाचे वर्तुळ पूर्ण व्हावे याची कसर बेरोजगारीचा दर भारतात प्रचंड वाढल्याच्या आकडेवाने पूर्ण केली.देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातही शहरी भागात हा दर सर्वाधिक आहे. कोरोना काळात शेती क्षेत्राने सर्वांना सांभाळून घेण्याचे कामं कामं केले. शहरी भागातील असंघटित क्षेत्रातील लोंढा मोठ्या संख्येने ग्रामीण भागात वास्तव्यास आला. ग्रामीण भागाने आपल्या परंपरागत संस्कृतीनुरुप त्यांना आपल्यात सामावून घेतले. आता नियम शिथिल झाल्याने परत हे चाकरमानी शहरात परतत आहे. मात्र रोजगाराच्या संधी आकसलेल्या आहेत. त्या मुळे शहरी रोजगारात कमालीची घट झाली. शासनाचे यावर लक्ष नाही. हंगर इंडेक्स मध्ये आपण सर्वात पुढे आहोत.
महागाई चा राक्षक प्रबळ होतं आहे. राळेगाव सारख्या शेतीवर उपजीविका असणाऱ्या तालुक्यातील व्यक्तीची क्रयशक्ती आकसलेली दिसते.आत्महत्येचा आलेख वाढतांना दिसतो. दुसरीकडे अवैध धंद्यांना सुगीचे दिवस आले आहे. शासनाने मात्र डोळ्यावर गांधारीगत पट्टी बांधून काही पाहायचेच नाही हे ठरवल्याने स्थिती गँभीर बनवल्याचे वास्तव अस्वस्थ केल्याखेरीज राहात नाही.
गावं ओस पडू लागली, सामाजिक समस्या वाढल्या
शेती परवडेनाशी झाल्याने शेतीत कुणीही थांबण्याचे नाव घेत नाही. शेती करणार्यां मुलांना कुणी मुली दयायला तयार नाही. या मुळे विविध सामाजिक समस्या नव्याने जन्म घेऊ लागल्या आहे. राळेगाव सारख्या ग्रामीण बहुल तालुक्यातील एका गावात तब्बल चार विवाहित महिलाना फूस लावून पळवून नेण्यात आले. विशेष म्हणजे त्यांना पळवून नेणारे लग्न न झालेले युवक आहेत. गावं ओस पडू लागली आहे. या हंगामात 30 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शासनाच्या धोरणात गावं हा घटक नाहीच. महात्मा गांधी नी गावाकडे चला हा नारा दिला होता. त्याचा उलटा प्रवास सुरु झाल्याची वर्दी मिळायला लागली.
0 टिप्पण्या