जिल्हयातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी शासनाच्या जाहीर केलेल्या मदतीच्या प्रतिक्षेत
वाशिम - गेल्या सप्टेंबर व ऑक्टोंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हयातील शेकडो शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकर्यांना शासनाने जाहीर केलेली मदत अद्यापही मिळाली नसल्याने शेतकरी हवालदील झाले असून शासनाने त्वरीत मदत द्यावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात २९ डिसेंबर रोजी जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद आहे की, जिल्ह्यात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानीची मदतीसाठी शासनाकडून निधी मंजूर झाला असला तरी हा निधी तालुक्यांना आणि संबंधित शेतकर्यांना वितरीत होताना दिसून येत नाही. या दोन महिन्यात अतिवृष्टीमुळे जिल्हयातील शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांसाठी शासनाकडून निधी मंजूर झाला होता. यंदा जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात पाऊस झाला. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसानेही धुमाकूळ घातला. यंदा पावसाळ्यात नदी-नाले भरून वाहत असून, सिंचन प्रकल्पातून तर अनेकदा पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पावसामुळे कापूस, सोयाबीनसह अन्य पिकांची हानी झाली. वातावरण बदलाचा फटका शेतीला बसत असून, यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतमालाचे उत्पादन प्रचंड घटले आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्यात आले. जिल्हा प्रशसानाने विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे निधी मागणी करण्यात आली. त्यानुसार मदत मंजूर झाली आहे. मात्र ही मदत अद्यापही पिडीत शेतकर्यांना मिळाली नसल्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. या शेतकर्यांना तातडीने मदतीचे वितरण करावे अन्यथा शेतकर्यांच्या उद्रेकाचा प्रशासनाला सामना करावा लागु शकतोे असा इशारा मनसेने दिला आहे.
0 टिप्पण्या