सहा महिन्यापासून ग्रामीण लाभार्थी मातृवंदना योजनेपासुन वंचित
वाशिम - गर्भवती महिला, स्तनदा माता आणि बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या उद्देशातून केंद्र सरकारने सुरु केलेल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या लाभापासून जिल्हयाच्या ग्रामीण भागातील लाभार्थी गेल्या सहा महिन्यापासून वंचित आहेत. या प्रश्नाकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लक्ष वेधत या लाभार्थ्यांना लाभाचे तातडीेने वितरण व्हावे अशी मागणी करत जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात २९ डिसेंबर रोजी जिल्हा आरोग्य अधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद आहे की, गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांना सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करुन त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबवली जाते. यामागे जन्माला येणार्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे हा हेतू आहे. सोबतच मातामृत्यू आणि बालमृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रणात रहावा या उद्देशानेही प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबविली जाते. महाराष्ट्रात २१ नोव्हेंबर २०१७ रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत प्रधानमंत्री मातृवंदना योजना लागू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. मात्र वाशिम जिल्हयाच्या ग्रामीण भागातील लाभार्थ्याना गत सहा महिन्यापासून या योजनेअंतर्गत लाभाचे वितरण झाले नाही. पुढील तीन महिन्यात निवडणूक आचारसंहिता अपेक्षीत असल्याने लाभार्थ्यांना लाभ होण्यासाठी तांत्रिक अडचणी येवू शकतात. त्यामुळे संभाव्य निवडणूकीआधी ग्रामीण लाभार्थ्यांना त्वरीत लाभाचे वितरण व्हावे अशी मागणी मनसेने केली आहे.
0 टिप्पण्या