पात्र शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज द्यावे -जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

 प्रतिनिधी : राजेश चव्हाण


पात्र शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज द्यावे -जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.


• खरीप पीक कर्ज वितरणाचा आढावा


वाशिम, दि. १८ (जिमाका) : आगामी खरीप हंगामाकरिता बियाणे, खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना वेळेवर पैसे उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे बँकेत येणाऱ्या प्रत्येक पात्र शेतकऱ्याला बँकांनी तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिल्या. खरीप पीक कर्ज वितरणाचा आढावा घेण्यासाठी आज, १८ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.


यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, ‘नाबार्ड’चे जिल्हा व्यवस्थापक शंकर कोकडवार, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सुधीर मैत्रेवार, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.


जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, खरीप पीक कर्जासाठी बँकेत येणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी प्रयत्न करावेत. पात्र शेतकऱ्यांची पीक कर्जाची प्रकरणे प्रलंबित ठेवू नयेत. ३१ मे पर्यंत खरीप पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण होणे आवश्यक असून यासाठी सर्व बँकांनी नियोजनबद्ध काम करावे, असे त्यांनी सांगितले. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका लक्षात घेवून बँकांमधील गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. बँकेमध्ये कोरोना सुरक्षा नियमांचे पालन होईल, याची दक्षता घ्यावी. बचत खातेधारकांना जिल्हाधिकारी कार्यालयाने खाते क्रमांकाच्या शेवटच्या क्रमांकानुसार बँकेत प्रवेश देण्याचे आदेश दिले आहेत. सर्व बँकांनी या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.


जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी यावेळी खरीप पीक कर्ज वितरणाची सद्यस्थिती, पीक कर्ज वितरणामध्ये बँकांना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजना याविषयी माहिती घेतली. तसेच अडचणी दूर करण्यासंदर्भात लवकरच आवश्यक निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.


श्री. निनावकर यांनी खरीप पीक कर्ज वितारणाच्या सद्यस्थितीविषयी माहिती देवून जिल्ह्यात १७ मे २०२१ पर्यंत ५८ हजार ४९९ शेतकऱ्यांना ४६७ कोटी १० लक्ष १८ हजार रुपये पीक कर्ज वितरीत करण्यात आले असल्याचे सांगितले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या