पृथ्वीवरची आपली दिवाळी संपली असली तरी आकाशातली एक दिवाळी अजून बाकी आहे. ती म्हणजे सिंहस्थ उल्कावर्षाव (leonids meteor shower). दरवर्षी १४ ते २२ नोव्हेंबर दरम्यान आकाशात उल्कांची ही आतिषबाजी दिसते. त्याचे केंद्र सिंह तारकासमूहात असल्या सारखे ‘दिसत' असल्याने याला *सिंहस्थ किंवा लिओनिड्स* असे म्हणतात.
१७ नोव्हेंबरच्या रात्री याचा सर्वोच्च वर्षाव दिसू शकतो.
अंधाऱ्या रात्री आकाशात सर्रऽऽर्कन् एखादी प्रकाश रेषा चमकून जाताना आपल्याला दिसते.त्याला आपण तारा तुटला असं म्हणतो. प्रत्यक्षात हा तारा नसून उल्का असते . अवकाशात धूमकेतू किंवा लहान- मोठे लघुग्रह यांच्या मार्गात अनेक धूळ आणि दगड आणि अनेक छोट्या अ-ग्रहीय वस्त असतात त्यांना उल्काभ असे म्हणतात. असे उल्काभ जेव्हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणा मुळे पृथ्वीकडे खेचले जातात, तेव्हा वातावरणाशी घर्षण होऊन ते जळतात आणि आपल्याला त्याची प्रकाश शलाका म्हणजे उल्का दिसते.
१४ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत सिंह तारका समूहातून होणारा *सिंहस्थ उल्कावर्षाव टेम्पल- टटल या धूमकेतूमुळे होतो.* आज १७ तारखेच्या मध्यरात्री नंतर या उल्कावर्षावा चा केंद्र असणारी सिंह रास पूर्वेला उगवेल. उत्तररात्री 3 वाजेपर्यंत ती डोक्यावर आली असेल. हि उल्कावर्षाव बघण्याची सर्वोत्तम वेळ. साधारणपणे सिंह राशीच्या आसपास या उल्का दिसू शकतील. पहाटे सूर्योदयापूर्वी पर्यंत आपल्या घराच्या गच्चीवरुन किंवा किंवा मैदाना वरून उल्कापात साध्या डोळ्यांनी बघता येईल. अंदाजे ताशी १५ ते २० उल्का दिसू शकतील. कदाचित प्रकाशाच्या प्रदुषणामुळे कमी प्रमाणात उल्का दिसतील. शहरापासून थोडे दूर अंधाऱ्या ठिकाणी गेल्यास हा वर्षाव सुस्पष्ट दिसू शकेल.
17 व18 रोजी रात्री आकाशातली ही नैसर्गिक आतिषबाजी आपण नक्की पहावी
0 टिप्पण्या