गोर बंजारा संस्कृतीची खऱ्या अर्थाने जपवणूक करणारा समाज
वैभवशाली संस्कृतीचा वारसदार असणारा गोर बंजारा समाज, आपली वेगळी बोलीभाषा, वेशभूषा, खाद्यसंस्कृती, धाटी, रूढी परंपरेसोबतच आपले सण महोत्सवही वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करत असतो. या सण उत्सवामध्ये आनंदासोबतच सप्तरंगांची उधळण करणारा सण म्हणजे होळी.. समाजातील प्रत्येक घटकाला उत्साहाच्या रंगात रंगवणारा उत्सव अशीही या होळीची ओळख, गोर बंजारा समाजात होळी म्हणजे आनंदाची पर्वणीच असते.
या होळी महोत्सवानिमित्त गोर बंजारा ज्ञानपीठ लोधीवली (लदेणीगड) मुंबई येथे गोर नायक किसनभाऊ राठोड यांनी भव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन करत, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, कोकण विभागातील बंजारा बांधवांसह, इतर समाज बांधवांना वैभवशाली अशा गोर बंजारा संस्कृतीचे दर्शन घडवल. ज्ञानपीठावरील या होळीत 'पाल मांडणे, सुवाळी तळणे, 'गेर', 'फगवा', 'धुंड' अशा अनेक परंपरा कशा जोपासल्या जातात हे मला पहिल्यांदा पाहायला मिळालं.
होळीच्या पहिल्या दिवशी गोर नायक किसनभाऊ राठोड यांनी नायक या नात्याने दंडाचा रुपया दिला. नायकांकडून हा दंडाचा रुपया घेऊन मग गोर बंजारा संस्कृतीनुसार पाल मांडण्यात आली. पाल मांडणे सुरु असताना दुसरीकडे पारंपारिक वेशभूषेत फेर धरून गोर बंजारा संस्कृतीनुसार बंजारा भगिनी नाचत होत्या. तर दुसरीकडे बंजारा बांधव लेंगी गीत गात पायी जोडत होते.
यामध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे, माझी मुलगी माझा स्वाभिमान हा नारा देत, नारीशक्तीचं महत्व पटवून देतं मुलींचं धुंड करणं. धुंड म्हणजे एका अर्थाने मुलगी जन्माला आली याचा आभिमान बाळगत तिचं स्वागत करत, भावी आयष्यासाठी तिला धेर्याचे धडे देणे. गोर नायक किसनभाऊ राठोड यांनी पाच वर्षांपूर्वी मुलांचं धुंड जसं होत. त्याच प्रकारे मुलीचं धुंड करूया. असं म्हणत सर्वप्रथम पाच वर्षापुर्वी आपल्या स्वतःच्या मुलींचा धुंड साजरा करत नारी शक्तीचा सन्मान कसा करायचा हे आपल्या कृतीतून दाखवला. त्यांनतर दरवर्षी ज्ञानपीठावरील होळी महोत्सवात मुलींचे धुंड साजरे होतात. यावर्षीही ज्ञानपीठावरील होळी महोत्सवात 11 मुलींचे धुंड साजरा करण्यात आले. रात्री पाल पूजन करून, धुंड करण्यासाठी आलेल्या मुलींना नायक नायकण वडीलधारी मंडळींनी आशीर्वाद दिला .यांनतर ज्यांचे लग्न या वर्षात करायचे आहे अशा उपवर मुलांनी होळीसाठी लाकडं जमा केली. या उपवर मुलांना 'गेरीया' असं म्हटलं जातं. लेंगी गीत गात नायकासोबत होळीकडे जाऊन होळीची पूजा करून ज्ञानपीठासमोर होळी रचण्यात आली.
यांनतर पायी जोडत, लेंगी खेळत, मौखिक असणाऱ्या लेंगी गीतांच्या माध्यमातून गोर बंजारा समाजाच्या वैभवशाली संस्कृतीची माहिती देणारी, बंजारा समाजाचा संघर्ष सांगणारी, शिक्षण, व्यसनमुक्तीचं महत्व सांगणारी लेंगी गीतं. होळीच्या दिवशी रात्रभर ज्ञापीठावर सुरु राहिली विशेष म्हणजे गोर नायक किसनभाऊ राठोड स्वतः पायी जोडत लेंगी खेळात रात्रभर होळीचा आंनद सर्वांसोबत साजरा करत होते.
यांनतर पहाटे ज्ञानपीठावरील होळी बंजारा संस्कृतीनुसार दहन करण्यात आली. त्यांनतर होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमीच्या दिवशी गोर बंजारा ज्ञानपीठावर आलेले सर्व भाविक आनंदात हरवून गेल्याचे दिसले . येथे आलेल्या महिलाभगिनींनी यादिवशी बंजारा लोकगीतं गात गोर नायक किसनभाऊ राठोड यांच्याकडून ( गेर ) 'फाग' किंवा 'फगवा' मागितला.'फगवा' किंवा 'फाग' म्हणजे होळीचा आनंद साजरा करण्यासाठी समाजातील व्यक्तीकडून आनंदाने आणि हट्टाने घेतलेले पैसे. बंजारा बोलीत याला गेर म्हणतात. यासोबतच लेंगी गीत गात एखाद्याची खेचणारी, एकमेकांना चिडवणारी वात्रटिकाही या दिवशी सुरु असल्याचं पाहायला मिळाली. यासोबतच लेंगी लोकगीतांच्या माध्यमातून महिला व पुरुष यांच्यामध्ये शब्दिक चकमक होतानाही दिसली.
लोक गीतांवर डफाच्या साथीने चौफेर ठेका धरून नृत्य सादर करत समाजातील पुरुषांना यथेच्छ लाकडी दंडुक्यांनी हाताखालून एक आगळ्या – वेगळ्या पद्धतीची होळी सुरु झाली. ज्ञानपीठावर आलेल्या समाजातील नात्याने दिर – भावजयी यांचा या होळी सण साजरा करतांनाच उत्साह काही न्याराच दिसला . चेष्टेचं नातं असलेल्या समाजातील पुरुषांना लाकडी दंडुक्यान मार खात ठोकलेला खुंटा उपसवण्याचं तगड आव्हान या महिलांनी ( गेरनी ) दिलेलं होत. हे आव्हान पेलवतांना पुरुष वर्गाची म्हणजे गेऱ्यांची मोठी धांदळ होताना दिसली.
पुढे ज्ञानपीठावर लहान बाळाला शिकवण संस्कार देण्याच्या कार्यक्रमांनंतर लेंगी गात खुंटा उपटणे या खेळाला सुरुवात झाली . खेळ सुरू झाल्यानंतर दोन खुंटे जमिनीत गाडलेले होते. हे खुंटे उपटण्याचे काम समाजातील पुरुष वर्गाकडे होते . जेव्हा जेव्हा हे पुरुष मंडळी खुंटा उपटण्यासाठी पुढे जात होते. तेव्हा महिला वर्ग आपल्या हातातील काठ्यांनी पुरुषांना यथेच्छ चोप देत आणि खुंटा उपटण्यास विरोध करत होत्या.
पुरुषही हा विरोध झुगारून लाकडी दंडुक्याने मार खात पुन्हा खुंटा उपटण्यासाठी प्रयत्न करत होते. लेंगी गात, पायी जोडत असा हा खेळ तासन तास सुरूच होता. जेव्हा हे खुंटे उपटले गेले तेंव्हा खेळाची सांगता झाली. आणि त्यांनतर गोर नायक किसनभाऊ राठोड आणि नायकण अलंक्रीत राठोड यांचा सुपारी सोडवण्याचा कार्यक्रम पार पडला, नायक, नायकण सोबत आणखी पाच जोडप्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. हा कार्यक्रमही मोठा दिलखुलास होता. यांनतर सर्व महिलांनी नायकण सोबत जाऊन होलिका मातेचं दर्शन घेतलं. यांनतर नायकण अलंक्रीत किसनभाऊ राठोड यांच्यासोबत सर्व गोर महिला भगिनींनी होलिका मातेचं दर्शन घेत गोर संस्कृतीनुसार गीत गात नृत्यही केले. यांनतर नायकांसोबत जाऊन सर्व पुरुषांनी होळीचं दर्शन घेतल.
एकंदरीत होळी इतरत्र दुसऱ्या समाजात महिलांना फारसं स्थान नसतं, पण गोर बंजारा समाजातल्या होळीतलं महिलांचं विशेष स्थान निश्चितच सुखावून जाणारं आहे. आणि त्यातल्या त्यात गोर नायक किसनभाऊ राठोड यांनी गोर बंजारा ज्ञानपीठ लोधीवली येथे साजरी केलेली होळी नारी शक्तीला बळ देणारी व गोर बंजारा संस्कृती महाराष्ट्रासह देशभरात पोहचवणारी, आणि गोर बंजारा समाजाची संस्कृती खऱ्या अर्थाने जपवणूक करणारी असल्याचं एकंदरीत मला या गोर बंजारा ज्ञापीठावरील होळी महोत्सवाच्या कार्यक्रमातून पाहायला मिळाल. गोर बंजारा संस्कृतीवर एवढं मनापासून प्रेम असणाऱ्या व संस्कृतीची खऱ्या अर्थाने जपवणूक करणाऱ्या लोकनायक किसनभाऊंचा समाजाने आदर्श घेतला पाहिजे.
0 टिप्पण्या