मोखाडा तालुक्यातील दक्षतनया गाडर हिने स्केटिंग खेळात एन्डुरन्स चॅलेंजच्या राज्यपातळीवर मिळवले कांस्यपदक
ग्रामीण भागासाठी स्केटिंग खेळ अजून म्हणावा तसा परिचित नाही. असे असले तरी मोखाडा सारख्या ग्रामीण तालुक्यातील घानवळ गावच्या कु.दक्षतनया व उत्कर्षा या गाडर भगिनींनी स्केटिंग खेळाचे कौशल्य आत्मसात करून आतापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन पदकं मिळवली आहेत. एन्डुरन्स चॅलेंज सायन येथील जिल्हा पातळीवरील चांगल्या प्रदर्शनाच्या जोरावर या गाडर भगिनींची एन्डुरन्स चॅलेंज राज्यपातळीवर ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली होती.
कु.दक्षतनया रामदास गाडर हिने स्केटिंगच्या एन्डुरन्स चॅलेंजमध्ये ठाणे जिल्ह्याचे 12 वर्षे वयोगटात प्रतिनिधित्व करताना खोपोली येथील स्केटिंग रिंकवर झालेल्या राज्यपातळीच्या स्केटिंग 3 क्रीडाप्रकारातील 3 कांस्य पदके मिळवली आहेत. त्यामुळे ती पुढील होणाऱ्या एन्डुरन्स चॅलेंजच्या स्केटिंग स्पर्धेत देशपातळीवर महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिच्या या स्केटिंग खेळातील कामगिरीमुळे मोखाडा तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
राज्यपातळीवरील कांस्यपदक विजेत्या दक्षतनयाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत. दक्षतनया गाडर ही सागर स्केटिंग अकॅडेमीमध्ये प्रशिक्षक श्री.कुलदीप सागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्केटिंगचे धडे गिरवत आहे.
0 टिप्पण्या