जिल्हास्तरीय खरीप आढावा ऑनलाइन बैठक संपन्न

 आज पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सन २०२०-२१ कृषी उत्पादन आढावा व सन २०२१-२२ जिल्हास्तरीय खरीप आढावा ऑनलाईन बैठकीस सहभागी झालो. यावेळी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत चाळीसगाव तालुक्यासह जिल्हाभरातील शेतकऱ्यांच्या अडचणी व उपाययोजना यावर मत व्यक्त केले. 


मागील हंगामात माझ्या मतदारसंघात निकृष्ट व विनापरवाना खत मिळून आलेले होते त्याचे मोठे रॅकेट असल्याचा संशय मी कृषिमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे व्यक्त केला होता, पुढे काय कारवाई झाली हे अजून गुलदस्त्यात आहे, सरकारने कुणालाही पाठीमागे न घालता शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवावी.


चालू रब्बी हंगामात हायटेक व इतर काही कंपन्यांचे निकृष्ठ ज्वारी व बाजरी बियाणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे, त्यांच्या नुकसानभरपाई बाबत देखील मंत्री महोदयांनी चौकशीचे आदेश दिले मात्र पुढे काय कारवाई झाली व अश्या बोगस बियाणे / खते  यांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शासन प्रशासनाने काय खबरदारी घेतली आहे असा प्रश्न उपस्थित केला.


जिल्हा बँकेच्या माध्यमातून अतिशय कमी प्रमाणात पिक कर्ज शेतकऱ्यांना देण्यात येते त्यामुळे शेतकरी खाजगी बँकांकडे वळत आहेत. त्यातल्या त्यात जिल्हा बँकेने ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे त्यांना सलग दुसऱ्या वर्षी देखील निम्मेच पीककर्ज दिल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे याबाबत तात्काळ सूचना द्याव्यात अशी विनंती पालकमंत्री महोदयांना केली.


मागील खरीप हंगामादरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले होते त्याचा पिक विमा क्लेम अजून मिळालेला नाही,

मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीटमुळे चाळीसगाव तालुक्यातील ८३ गावांमधील ३ हजार ६३० हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिके यामुळे बाधित झाली आहेत. जवळपास १० हजार ९१८ शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे नुकसान झाल्याचा पंचनाम्यांचा अहवाल प्रशासनाने सुपूर्द केला आहे.


कोरोनामुळे आधीच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले गेले आहे आणि आता शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने त्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.

केवळ औपचारिकता म्हणून या आढावा सभा न होता सततचा दुष्काळ, अवकाळी पाऊस, नापिकी यामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना आधार देणारे निर्णय या सभांमधून झाले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली.


कृषी विभागातील कर्मचारी यांना फ्रंटलाईन वर्कर मानण्यात येऊन त्याना कोरोना काळातील ५० लाखांचे विमा संरक्षण, लसीकरण यात प्राधान्य व जे कृषी विभागातील कर्मचारी कोविडमुळे मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना अनुकंपावर सेवेत सामावून घेण्यात यावे तसेच चाळीसगाव तालुक्यात कृषी विभागात अनेक पद रिक्त असल्याने शेतकऱ्यांना गैरसोय होत आहे याकडेही लक्ष वेधले.


गेल्या हंगामामध्ये शासनास अपेक्षित उत्पन्न साध्य झाल्याचे दिसून येत नाही त्यास सर्वस्वी बियाणे पुरवठादार कंपन्या तसेच नियोजन अभावी शेतकऱ्यांना उशिराने उपलब्ध झालेले बियाणे, खतांची अनुपलब्धता यामुळे शेतकऱ्यांचे देखील नुकसान झालेले आहे, यासाठी प्रशासनाकडूनवेळीच दक्षता घेणे अपेक्षित आहे, त्याकरिता हंगाम सुरु होण्यापूर्वीच सर्व बियाणे उत्पादक कंपन्यांना योग्य त्या खबरदारीच्या सूचना आपल्या विभागाकडून देण्यात याव्यात अशी सूचना केली.


- आमदार मंगेश रमेश चव्हाण




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या