प्रतिनिधी : राजेश चव्हाण
शेतकऱ्यांना पिक कर्ज, बियाणे व खते वेळेत उपलब्ध करा - पालकमंत्री शंभूराज देसाई
• खरीप हंगामपूर्व आढावा बैठक
वाशिम, दि. ०१ : मागील वर्षी महाबीज बियाणे उगवले नाही, अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. यावर्षी अशा तक्रारी येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. कोरोना संकटकाळातून शेतकरी जात असल्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक कर्ज, बियाणे व खते वेळेत उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आज, १ मे रोजी झालेल्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष डॉ. शाम गाभणे, खासदार भावना गवळी, आमदार सर्वश्री ऍड. किरणराव सरनाईक, लखन मलिक, अमित झनक, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, जिल्हा उपनिबंधक श्री. मैत्रवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. देसाई पुढे म्हणाले, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन घेण्यात येते. या वर्षी सोयाबीनला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे सरसकट सोयाबीन शेतकऱ्यांनी न विकता, येत्या खरीप हंगामात जास्तीत जास्त शेतकरी स्वतःचे बियाणे कसे वापरतील यासाठी कृषी विभागाने त्यांना प्रवृत्त करावे. राष्ट्रीयकृत व सहकारी मध्यवर्ती बँकांनी शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्जपुरवठा करावा.जास्त दराने जिल्ह्यात खते व बियाण्यांची विक्री होणार नाही याकडे कृषी विभागाने लक्ष द्यावे.प्रसंगी कृषी केंद्रावर गुन्हे दाखल करावे, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामासाठी बॅंकांनी आतापर्यंत ३९२ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप केले. ही चांगली बाब असल्याचे सांगून श्री. देसाई म्हणाले, जिल्ह्यातील कोणताही शेतकरी हा पीक कर्जापासून वंचित राहू नये. शेतकऱ्यांना तुलनात्मक प्रयोग पद्धतीतून उत्पन्न कसे वाढते, याची माहिती कृषी विभागाने देऊन शेतकऱ्यांना विविध प्रकारचे पीक उत्पन्नाचे प्रयोग दाखवावे. म्हणजे शेतकरी अशा प्रकारचे उत्पन्न घेण्यास प्रेरित होतील, असे श्री. देसाई म्हणाले.
खा. गवळी म्हणाल्या की, जिल्ह्यात सोयाबीनला पर्यायी पिके यावर्षी लावण्यात आली पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. शेतकर्यांधना आता दुसऱ्या पिकाकडे वळविणे गरजेचे आहे. यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा. कृषी विद्यापीठ व कृषी विज्ञान केंद्राची यासाठी मदत घ्यावी. शेतकऱ्यांना जैविक शेतीकडे वळविण्यासाठी कृषी विभागाने प्रोत्साहन द्यावे, असे त्या म्हणाल्या.
आ. झनक म्हणाले की, या वर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केली आहे. उन्हाळी सोयाबीन पिकविणाऱ्या शेतकऱ्यांशी कृषी विभागाने संपर्क साधून आगामी खरीप हंगामासाठी सोयाबीन पेरणीसाठी ते बियाणे कसे उपयोगात आणता येईल, यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावे. शेतकऱ्यांना पीक कर्ज, बियाणे व खते वेळेत उपलब्ध व्हायला हवीत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. तोटावार यांनी खरीप आढावाबाबत माहिती देताना सांगितले की, चालू वर्षी ४ लाख ६ हजार ४५० हेक्टारवर पेरणीचे नियोजन आहे. तालुक्याच्या बैठका लोकप्रतिनिधी व प्रगतिशील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या आहे. या वर्षी ३ लक्ष हेक्टनरवर सोयाबीन लागवडीचे नियोजन आहे. ४०० हेक्टारवर रब्बी व उन्हाळी हंगामात पेरणी करून अतिरिक्त ३ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची उपलब्धता केली आहे. घरगुती बियाण्याची उगवण क्षमता तपासणे, बीजप्रक्रिया व इतर तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करून तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविल्याचे त्यांनी सांगितले.
यावर्षी वार्षिक सरासरी इतका पाऊस होईल असे अनुमान भारतीय हवामान खात्याने नोंदविल्याचे सांगून श्री. तोटावार म्हणाले, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून गावस्तरावर शेतकऱ्यांच्या कॉर्नर बैठका सुरू केल्या आहेत. सोयाबीन बियाण्याची चाचणी, बीज प्रक्रिया करून पेरणीसाठी शेतकरी सज्ज राहणार आहे. ट्रॅक्टरद्वारे पेरणी करतांना ट्रॅक्टलर ड्रायव्हर व पालक यांच्याकडून चुका होणार नाही यासाठी तंत्रशुद्ध पद्धतीने पेरणी करण्याचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. खरीप हंगामासाठी रासायनिक खताची ६१ हजार ८०० मेट्रिक टन मागणी केली असून ३४ हजार ८०६ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे. चालू हंगामात दर्जेदार व गुणवत्तादर्शक निविष्ठांचा पुरवठा व्हावा, यासाठी जिल्ह्यात सात भरारी पथके व पंधरा गुण नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती तोटावार यांनी दिली.
जिल्ह्यात खरीप हंगामाकरिता ९०० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट निर्धारित केल्याचे सांगून जिल्हा अग्रणी व्यवस्थापक श्री. निनावकर म्हणाले, २८ एप्रिलपर्यंत ४६ हजार ८८५ शेतकऱ्यांना ३७४ कोटी ९३ लक्ष रुपये पीककर्ज वाटप केले आहे. उद्दिष्टांच्या ४१.६५ टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या बैठकीला संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. कृषि विभागाने बीजप्रक्रिया, उगवण क्षमता तपासणी, पेरणी, रासायनिक खतांचा वापर याविषयी माहिती देणारी भिंतीपत्रिक तयार केली असून या भिंतीपत्रिकेचे विमोचन पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
0 टिप्पण्या