मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी लसीकरण मोहीम, प्रतिबंधित क्षेत्राची केली पाहणी

 प्रतिनिधी : राजेश चव्हाण

मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी
लसीकरण मोहीम, प्रतिबंधित क्षेत्राची केली पाहणी


• मानोरा तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रात विविध ठिकाणी भेटी


वाशिम, दि. २७ (जिमाका) : कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी ग्रामीण भागात करण्यात येत असलेल्या उपाययोजना आणि लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी २६ एप्रिल रोजी मानोरा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, प्रतिबंधित क्षेत्रांना भेट देवून पाहणी केली. तसेच ग्रामस्तरीय समिती, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून कार्यवाहीचा आढावा घेतला.


यावेळी मानोरा पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी जयश्री वाघमारे, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आढाव, सहाय्यक तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मानके, आरबीएसके नोडल अधिकारी डॉ. हेडा, शेंदुरजना प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गावंडे, पोहरादेवी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भोंगाडे यांची उपस्थिती होती. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पंत यांनी पोहरादेवी व शेंदूरजना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देवून तेथील लसीकरण मोहीम, कोरोना चाचण्या याविषयी आढावा घेतला. तसेच शेंदोना येथील प्रतिबंधित क्षेत्राला भेट देवून तेथील उपाययोजनांची पाहणी केली.


यावेळी श्रीमती पंत म्हणाल्या, ग्रामीण भागातील कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी ग्रामस्तरीय समितीचा सक्रीय सहभाग आवश्यक आहे.प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करून गावातील कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्याची जबाबदारी या समितीवर आहे. तसेच गावातील एखादी व्यक्ती कोरोना बाधित आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील सर्व व्यक्तींची कोरोना चाचणी करून घेणे, लसीकरण मोहिमेसाठी पात्र व्यक्तींना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्याचे काम ग्रामस्तरीय समितीने करावे. कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी कोरोना चाचण्यांची संख्या वाढविणे तसेच लसीकरण मोहिमेची गती वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या