पुणे जिल्ह्यातील आळंदीमध्ये वाहतूक कोंडीमुळे एका 21 वर्षीय तरुणीला ॲम्बुलन्समध्येच जीव गमवावा लागला आहे. उज्वला नामदेव झाडे असं मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे. आळंदी पोलीस ठाणे ते ग्रामीण रुग्णालयापर्यंतच्या रस्त्यावर बेकायदेशीर रहदारीमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
उज्वला ही आंब्याच्या झाडावरून पडून जखमी झाली होती. ती घराच्या गॅलरीतून आंब्याच्या झाडाचे आंबे काढत होती. त्यावेळी तिचा तोल गेला आणि ती झाडावरुन खाली पडली. उंचावरुन पडल्यामुळे उज्वलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तिला तात्काळ उपचारासाठी रुग्णवाहिकेतून आळंदीच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात येत होते.
प्रचंड वाहतूक कोंडीमुळे तिला वेळेवर उपचार मिळाले नाहीत आणि त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर रात्री उज्वलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आळंदी पोलीस स्टेशन परिसरातून रुग्णालयाकडे जाताना उज्वलाचा श्वासोश्वास सुरू होता; मात्र रुग्णवाहिका जवळपास अर्धा तास वाहतूक कोंडीत अडकून पडली होती
ही वाहतूक कोंडी नसती तर वेळेवर उपचार मिळून तिचा जीव वाचला असता असे उज्वलाच्या नातेवाईकांनी सांगितले तसेच शहरात उज्वला ही तरुणी वाहतूक कोंडीचा बळी ठरल्याची चर्चा आहे
0 टिप्पण्या