वाढत्या व्यसनाधीनतेचे तरुणांचे बळी समाजासाठी एक गंभीर समस्या

 बंजारा युवकात वाढलेली व्यसनाधीनता...


    वाढत्या व्यसनाधीनतेचे तरुणांचे बळी समाजासाठी एक गंभीर समस्या!

   _______________________

डॉ  .गजानन जाधव

आज लिहिताना अतिशय वेदना होतात, वाईटही वाटते. परंतु व्यसनाधीनता हि बंजारा समाजासाठी एक गंभीर बाब बनलेली आहे. तिशीच्या उंबरठ्यावर असणारी तरुण, तरणीबांड पोरं आज व्यसनाधीनतेने बळी पडत आहेत. याचे प्रमाण बंजारा समाजामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तरणीबांड पोरं ज्यांच्या खांद्यावर कुटुंबाचं ओझं असणारी अशी तरुण मंडळी आज व्यसनाला बळी पडताय आणि आपल्या कुटुंबाला अगदी वाऱ्यावर सोडतांना दिसतात. व्यसनाचे परिणाम भयंकर असतात. त्याचे परिणाम स्वतःलाच नाही तर आप्तेष्ट, मित्रमंडळी, कुटुंब, नातेवाईक यांना देखील भोगावे लागतात.

    वाढती सुबत्ता, मेहनतीचा अभाव, संघर्ष करण्यासाठी लागणारी जिद्द आणि आत्मविश्वासाचा अभाव. वाटेल त्या परिस्थितीत जगण्यासाठी लागणाऱ्या मानसिकतेचा अभाव. यातून व्यसनाला बळी पडणे. अशा व्यसनामुळे युवा पिढी आज वाया जात आहे. व्यसन आणि त्यांचें दूरगामी परिणाम माहीत असून त्यापासून परावृत्त होण्याकडे आजच्या तरुणांचा कल नाही. 

     व्यसन म्हणजे एखादी अशी सवय की, ज्यामुळे मोठय़ा प्रमाणावर शारीरिक, मानसिक व सामाजिक त्रास होत असल्याची जाणीव होत असूनही त्यात बदल करणे शक्य होत नाही. कोणतीही व्यक्ती व्यसनाधीन होण्यासाठी मद्यसेवन करत नाही. काल्पनिक अथवा वास्तवातील प्रश्नांपासून दूर जाण्यासाठी दारू किंवा अमली पदार्थाचा वापर केला जातो. पैशांचा गैरवापर, मार्गदर्शनाचा अभाव, उत्सुकता, संगत या आणि अशा काही कारणांमुळे व्यसनाधीनता हा एक मानसिक रोग होतो. व्यसन एक विनाशकारी वादळ आहे. या वादळात आज आपल्या देशातील युवा पिढी अडकलेली आहे. या विनाशकारी वादळाला आत्ताच जर थांबवले नाही, तर कितीतरी नवयुवक आणि युवती याला बळी पडतील. मेंदूला बधीर करणा-या कोणत्याही मादक पदार्थाचे अतिरेकी सेवन करणारी व्यक्ती म्हणजेच व्यसनी व्यक्ती. ही व्यक्ती स्वत:च्या पायाने एक एक पायरी उतरत मृत्यूच्या गर्तेत एके दिवशी संपून जाणार आहे.

        मादक पदार्थ म्हणजे तंबाखू, सिगारेट, दारू, गांजा, चरस, झोपेच्या गोळय़ा इत्यादी. अशा प्रकारच्या कोणत्याही पदार्थाचे अतिरेकी सेवन करणा-या व्यक्तीला व्यसनी ही पदवी प्राप्त होते. व्यसनी व्यक्ती स्वत: विनाशाकडे जातच असते आणि त्याबरोबर बायको, मुले, आप्तपरिवार, मित्रमंडळी अशा अगणित कुटुंबांना दु:खात लोटत असते.

      या सगळय़ा गोष्टीचा विचार केल्यावर व्यसनरूपी विनाशकारी वादळाची तीव्रता किती भयंकर आहे, हे कळते. फक्त इच्छाशक्तीच्या बळावर दारू सुटू शकत नाही. त्याला योग्य प्रयत्नांची जोड, योग्य मार्गदर्शन तसेच योग्य औषधोपचारांची साथ हवी. प्रत्येक गावात समाजसेवी संस्थांनी हा विषय हाती घेणे, आवश्यक आहे. अन्यथा व्यसनाच्या विनाशकारी जाळय़ामध्ये अडकलेली युवा पिढी या महान देशाचा गाडा ताकदीने ओढून एकविसाव्या शतकामध्ये नेण्यापूर्वीच संपून जाईल.

     यासाठी म्हणून व्यसनाला प्रवृत्त करणाऱ्या कोणतीही संस्कृती वा परंपरा असो याला बंजारा समाजाने मुळापासून संपविणे गरजेचे आहे. व्यसन आज जरी दुसऱ्याच्या दारावर असेल तरी ते कधीही तुमचे दार ठोठावेल हे सांगता येत नाही. म्हणून आपल्या घरात असो वा दारात, शेजारी असो व आजूबाजूला असो त्याचा कायमचा बंदोबस्त करणे हाच एकमेव पर्याय आहे. आपला आहार, आपले सखे-सोयरे, सोबती आणि आपली संगत चांगली ठेवा. 


चला करूया निर्धार..

    व्यसनाला कायमचे करु हद्दपार !


आपला 

प्रा डॉ गजानन जाधव

_________________

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या