माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन गणपती सुट्टीपूर्वी करण्याची शिक्षक भारतीची मागणी
प्रतिनिधी : हेमंत घाटाळ
पुढील महिन्यात गणेश उत्सव हा कोकणातील एक अत्यंत महत्त्वाचा धार्मिक सण साजरा होत असल्याने या सणाच्या निमित्ताने तरी ऑगस्टचे वेतन गणपती सणापूर्वी सर्व शाळा कर्मचाऱ्यांना प्राप्त व्हावे अशी मागणी शिक्षक भारतीने राज्याच्या माध्यमिक शिक्षक संचालकांकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबतच्या प्राप्त माहितीनुसार गेले अनेक महिने राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कर्मचाऱ्यांचे वेतन किमान एक ते दीड महिना उशिराने होत आहे. याबाबत आवश्यक असलेल्या वेतन अनुदानाची तरतूद अगदी अखेरच्या क्षणी केली जाते. त्यानंतर त्या महिन्याचे वेतन अदा होण्यास पुढील महिन्याचा शेवट उजाडतो अशी स्थिती गेले अनेक महिने सुरू आहे.
या उशीर होण्याला वेतन अनुदान मंजुरीबरोबरच सर्वात महत्वाचे कारण म्हणजे माध्यमिक विभागाच्या वेतन पथकाला शिक्षण संचालकांची वेतन अनुदानाची मूळ शाईची सही असलेली मंजूर प्रत माध्यमिक वेतन पथकाकडे वेळेवर पोहोचत नाही.
सदरची परत ईमेल द्वारा प्राप्त होत असली तरी, शाईची सही असलेली मूळ प्रत मात्र खूपच उशिरा पोहोचल्याची उदाहरणे अनेक जिल्ह्यात दिसून येत आहेत. मूळ शाईची प्रत मिळाल्याशिवाय जिल्ह्याची ट्रेझरी वेतन अदा करत नाही.
त्यामुळे वेतन अनुदान असूनही कर्मचाऱ्यांना वेतन उशिरा मिळत असल्याचे दिसून येत आहे.
यासाठी सदर शाईची प्रत तात्काळ
वेतन पथकाला उपलब्ध करावी किंवा ई-मेल द्वारा वेतन पथकाकडे प्राप्त झालेल्या प्रतीवर वेतन अदा करण्याची सोय व्हावी अशी मागणी शिक्षक भारतीकडून करण्यात येत आहे.
त्याचबरोबर गणपती उत्सव लवकरच येत असल्याने ऑगस्टचा पगार सप्टेंबरच्या एक तारखेलाच शाळा कर्मचाऱ्यांना मिळावा अशी आग्रही मागणी शिक्षक भारतीचे कोकण विभागीय अध्यक्ष धनाजी पाटील यांनी माध्यमिक शिक्षण संचालकांकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
0 टिप्पण्या