बेकायदेशीर अडत वसुलीच्या विरोधात शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात

 


मानोरा- ऊन,वारा,पाऊस, थंडी मध्ये प्रचंड कष्ट करून आणि वन्य प्राण्यांचा हैदोस तथा मानवनिर्मित बनावट बियाण्यां सारख्या आपत्ती व निसर्गाच्या कोपाचा  सामना करून कसेबसे चार दाणे आपल्या पदरात राबराब राबून पाडणाऱ्या शेतकऱ्यांवरील हमाली,दलालीचे व व्यापार्‍यांच्या आर्थिक पिळवणूकीचे चक्रव्यूह बंद न केल्या गेल्यास कृषी उत्पन्न बाजार समिती मानोरा येथे शेतकऱ्यांच्या असंतोषाचा भडका उडून आक्रीत  घडण्याचा इशारा शेतकरी परिवर्तन संघटनेच्यावतीने प्रशासनाला देण्यात आला आहे.

तालुक्यातील शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटांनी आधीच पोखरलेला असून येनकेन प्रकारे मोठ्या मेहनतीने शिवारातून पिकविलेले पिके विकण्यासाठी बाजार समितीमध्ये आणल्यानंतर दलाल अडते आणि व्यापाऱ्यांकडून शासकीय धोरणाच्या विरोधामध्ये जाऊन दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी 2% आणि एका आठवड्यासाठी एक टक्का कपात/वजावट करून शेतकऱ्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास देण्याचा प्रकार मागील अनेक वर्षापासून मानोरा येथे चाललेला आहे याविरोधात शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड  खदखद आहे.

बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांनी आणलेल्या मालाच्या खरेदी च्या वेळी शेतकऱ्यांनाकुठल्याही प्रकारचा भुर्दंड देण्यात न देण्याच्या कृषी आणि सहकार विभागाच्या सक्त सूचना असतांनाही आडमार्गाने बेमालूमपणे शेतकऱ्यांना आर्थिक अडवणूक करून शेतकऱ्यांकडून पैसा वसूल केला जात असल्याने पुढील दोन आठवड्यात हा प्रकार बंद न झाल्यास परिवर्तन शेतकरी संघटनेकडून या घाणेरड्या प्रकारा विरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याचे शेतकरी नेते मनोहर राठोड यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या