आ. मंगेश चव्हाणांची चाणक्यनिती ठरली ' परफेक्ट'

 राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे राहीले गाफील, आ. मंगेश चव्हाणांची चाणक्यनिती ठरली ' परफेक्ट'



जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जिल्ह्याच्या दृष्टीने फार मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या असुन स्पष्ट बहुमत राष्ट्रवादी व काँंग्रेसकडे असतांना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची राजकीय कोंडी करण्यात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील हे यशस्वी ठरले. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ संचालक संजय पवार हा मोहरा पुढे करून भाजपाचे आ. मंगेश चव्हाण यांनी जिल्हा दूध संघाच्या पाठोपाठ जिल्हा बँकेतही आ. खडसेंचा 'करेक्ट कार्यक्रम' लावण्यात सत्ताधारी मंडळी यशस्वी झाली.


जिल्हा बँक पंचवार्षिक निवडणुक ही सर्वपक्षीय पॅनलच्या माध्यमातून आ. एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आली. शिवसेनेचे सात संचालक,काँग्रेसचे तीन, राष्ट्रवादीचे १० व भाजपाचे एकमेव संजय सावकारे हे निवडून आले आहेत. या निवडणुकीत भाजपाने अर्थात ना. गिरीष महाजन यांनी सर्वच उमेदवारांची माघार घेतली होती. एक वर्षासाठी चेअरमन, व्हा.चेअरमन यांची निवड झाली होती. ठरल्याप्रमाणे गुलाबराव देवकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. शिवसेनेचे सातपैकी सहा संचालक हे राज्याच्या घडामोडीनंतर शिंदे गटात गेले. परंतु पक्षीय राजकारण होणार नाही असे चित्र होते. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ठरलेल्या फॉर्म्युल्याप्रमाणे खडसे ठाम राहीले. परंतु शिंदे गटाच्या सहा संचालकांनी वेगळी चुल मांडली. याचा थांगपत्ताही खडसेंना लागला नाही.

ऐन मतदानाच्या दिवशी मुक्ताई बंगल्यावर आ.खडसेंनी बैठक बोलाविली. राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये समन्वय व काँग्रेसशी संवाद नसल्याचा फायदा भाजपाने उचलला. बैठकीत आ.खडसेंच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे विद्यमान अध्यक्ष संजय पवारसह सर्वच राष्ट्रवादीचे संचालक उपस्थित राहीले. परंतु संजय पवार यांची खेळी शेवटपर्यंत खडसे किवा राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या लक्षात आली नाही. इकडे भाजपाच्या नेत्यांनी रात्रीच खेळी खेळून 'मिशन जिल्हा बँक' ही मोहीम यशस्वी राबविली होती. संजय पवार हे शेवटच्या क्षणापर्यंत आ.खडसेंसह राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अवती भोवती होते. परंतु पवार हे जरी सहकारातले मुरब्बी राजकारणी असले तरी त्यांना फार काही महत्व देण्यास राष्ट्रवादीच्या नेत्यांचे संकुचित मन तयार नव्हते. ते नेते त्यांच्या अविर्भावातच होते. शेवटी २० वर्ष सहकारात बिनविरोध संचालक म्हणून निवडून येण्याची परंपरा असलेले संजय पवार यांची सुप्त इच्छा लपुन राहीली नाही आणि हीच संधी भाजपाचे आ. मंगेश चव्हाण यांनी हेरली आणि सर्व 'राजकीय जुगाड' रात्रीच खेळत 'मिशन मोडवर' घडवून आणण्यासाठी पावले उचलली.


उपाध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदे गटाचे अमोल चिमणराव पाटील यांचे नाव निश्चित झाल्यानंतर उमेदवारी दाखल होईपर्यंत राष्ट्रवादीच्या नेत्यांना कुठली ही कानगी या घडामोडींची लागू दिली नाही. त्यांनी उपाध्यक्षपदासाठी काँग्रेस किंवा शिवसेना उबाठा गटाचा उमेदवारी अर्ज भरला असता तरी भाजपाची रणनिती फेल गेली असती. संजय पवार व उपाध्यक्ष अमोल पाटील यांचे सुचक अनुमोदक जरी राष्ट्रवादीच्या नेत्यांना कळले असते तरी ही राजकीय खेळी भाजपावर उलटली असती. शेवटी संजय पवार यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हलक्यात घेतले आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र पाटील यांना अध्यक्षपदाच्या निवडणूकीत पराभव पत्करावा लागला.

अध्यक्षपदासाठी संजय पवार हे विजयी झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये तु..तु ...मै..मै झाली. परंतु तो पर्यंत हातुन सर्वच बाण सुटले गेले होते. आ.खडसे यांचा राष्ट्रवादीच्या संचालकांसह काँग्रेसच्या संचालकांशी संवाद व निंवडणुकीचे योग्य नियोजन न झाल्यामुळे ही वेळ आली. अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीत भाजपाचा विजय झाला नसला तरी जिल्हा बँकेत खडसेंचे नेतृत्व हरण करण्यात भाजपा व शिवसेना शिंदे गटाचा उद्देश यशस्वी झाला आहे. विषेश म्हणजे भाजपा व शिंंदे गट शिवसेनेकडे संख्याबळ नसतांना व मविआकडे संख्याबळ परिपुर्ण असतांना देखील राष्ट्रवादीचे नेते 'अपडेट'नसल्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणूकीत संजय मुरलीधर पवार यांना निवडून आणण्यात भाजपा यशस्वी ठरली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या