सरस्वती व्याख्यानमाला पाहिले पुष्प गुंफताना श्री राजेंद्र वैशंपायन, पुणे
चाळीसगाव शेठ ना. बं. वाचनालय यांच्या तर्फे सरस्वती व्याख्यानमालेला दि. ७ एप्रिल पासून सुरुवात झाली. चार आश्रम - जगण्याचे व्यवस्थापन असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. हिंदू धर्मात ज्या चार आश्रमांचे वर्णन येते ते म्हणजे ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्याशाश्रम. हे चार आश्रम तसे वेगवेगळे वाटले तरी एकमेकांशी संबंधित आहेत. ब्रह्मचर्याश्रमात गृहस्थाश्रमाची तयारी होते. गृहस्थाश्रमात वानप्रस्थाश्रमाची तयारी होते. वानप्रस्थाश्रमात संन्याशाश्रमाची मानसिक तयारी होते. त्याचप्रमाणे या सगळ्या आश्रमांमध्ये एकमेकांशी संबंधित अशा गोष्टी आलेल्या .
ब्रह्मचर्यश्रम हे विविध विद्या आणि कला शिकण्याचे वय असते. पूर्वी गुरुकुलामध्ये १४ विद्या आणि ६४ कलांचे गुरु अध्यापन करीत असत. त्यातील ज्या कलेत किंवा ज्या विद्येत विद्यार्थ्याला रुची आहे ते हेरून त्याला त्यातील पुढील शिक्षण देत असत. यातीलच एखादी कला पुढील आयुष्यात त्याच्या उदरनिर्वाहासाठी उपयोगी पडत असे. ज्या गोष्टी किंवा ज्या कला शिकण्यासाठी अनेक वर्ष लागतात त्या शिकण्याची सुरुवात ब्रह्मचर्याश्रमापासूनच करावी लागते म्हणजे पुढील काळात त्या विकसित करता येतात. गृहस्थाश्रमात पदार्पण करण्यापूर्वी किंवा विवाहप्रसंगी मुला-मुलींना विवाह केल्यानंतर त्यांची कर्तव्ये काय आहेत हे समजावून देणे हे गृहस्थाश्रमी व्यक्तींचे कर्तव्य असते. त्याचप्रमाणे गृहस्थाश्रमी व्यक्तींनी सल्ला मागितला तर देणे हे वानप्रस्थाश्रमातील व्यक्तींनी करायचे असते. आपल्या हाताला देण्याची सवय लागली पाहिजे. आपल्या उत्पन्नातील सहा टक्के वाटा हा समाजाचा आहे. तो देण्यासाठी गृहस्थाश्रमापासूनच सुरुवात केली पाहिजे. वानप्रस्थाश्रमात आपल्या उत्पन्नाच्या ५०% वाटा समाजाला देता आला पाहिजे.
पूर्वी वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रमासाठी अरण्यात जावे लागायचे. परंतु आज आपल्याला घरात राहूनच त्यांची सवय करायला हवी आणि वानप्रस्थाश्रम आणि संन्याशाश्रमातील कर्तव्ये आचरणात आणायला हवी.
पत्नी घर सांभाळते म्हणून तिला कमी लेखू नका. घर सांभाळणे ही सुद्धा मोठी जबाबदारी आहे. मी का जगतो आणि कशासाठी जगतो याही प्रश्नांची उत्तरं आपल्याला कळली पाहिजेत. ती कळली म्हणजे जीवन जगणे सुखकारक होईल. वानप्रस्थाश्रमात मुलांच्या संसारात जास्त लक्ष घालू नये. एखादी गोष्ट त्यांनी विचारली तरच सांगावी. मानापमानापासून दूर जाता यायला हवं. याची सुरुवात वानप्रस्थाश्रमापासून होते. वानप्रस्थाश्रमात आपण मुलांच्या सोबत असतो. त्यांच्यासोबत आपलं असणं ही आनंदाची गोष्ट असली पाहिजे. संन्याशाश्रमात आपण पाहुण्यांसारखं राहायला शिकले पाहिजे. संन्याशाश्रमात नामस्मरण करायला हवं. या नामस्मरणाची सुरुवात गृहस्थाश्रमापासूनच झाली तरच संन्यास आश्रमात ते येऊ शकेल. या सगळ्या गोष्टींमध्येच मानवी जीवनाचे सार्थक आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. मुकुंद करंबेळकर कार्यवाह श्री राजेश ठोंबरे, सहकार्यवाह श्री मिलिंद देव व्याख्यानमालेचे निमंत्रक श्री मनीष शाह उपस्थित होते.
व्याख्यानमालेचे प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष डॉ मुकुंद करंबळेकर यांनी केले. व्याख्यात्यांचा परिचय विश्वास देशपांडे यांनी करून दिला. प्रा. मधुकर कासार यांनी सूत्रसंचालन केले. वाचनालयाचे कार्यवाह राजेश ठोंबरे यांनी सर्वांचे आभार मानले.



0 टिप्पण्या