छत्रपती संभाजीनगर (दिनांक-२५) वसंतराव नाईक महाविद्यालयात बंजारा संस्कृती संवर्धन केंद्र उभारण्यासाठी पूर्व तयारीकरीता आज नाईक महाविद्यायाच्या सभागृहात वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नितीन राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
काळाच्या प्रवाहात लुप्त होत जाणारी बंजारा समाजाच्या संस्कृतीला जीवंत ठेवण्यासाठी आणि येणाऱ्या पीढिबरोबरच देश आणि जगाला या संस्कृतीची ओळख व्हावी या उद्देशाने हे केंद्र उभारण्याचा मानस संस्थेचे अध्यक्ष समाजभूषण प्राचार्य राजाराम राठोड आणि सचिन नितीन राठोड यांनी केलेला आहे. छत्रपती संभाजीनगर हे ऐतिहासिक शहर असून जागतिक पातळीवरील पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. एखाद्या समाजाची संस्कृती ही केवळ त्या समाजाची संस्कृती नसते तर ती त्या राष्ट्राचा अनमोल ठेवा असतो. भारतातील हजारो जाती , जमाती आणि त्यांची संस्कृती जतन करणे म्हणजे वैभव संपन्न राष्ट्रीय ठेवा जतन करणे होय. या पार्श्वभूमिवर बंजारा संस्कृती संवर्धन केंद्र उभारण्यात येत आहे. संस्कृती जतन करण्याबरोबरच या समाजाचा समग्र इतिहास, राष्ट्र उभारणीसाठी दिलेले योगदान, या देशाची संस्कृती, सभ्यता, धर्म रक्षणासाठी केलेला त्याग व समर्पण , साहित्य या अशा विभिन्न विषयांवर येणाऱ्या पीढिला संशोधन करता यावे म्हणून हे केंद्र अत्यंत उपयोगी ठरणार आहे.
आज पार पडलेल्या बैठकीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख साहित्यिक डॉ. अशोक पवार, किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड, प्रा.बी.यु.राठोड, फुलसिंग जाधव, दत्ताभाऊ राठोड, किसन पवार, के.डी. राठोड, वैजनाथ राठोड, उल्हास पवार, गणपत पवार आदिनी मार्गदर्शन केले. बैठकीचे अध्यक्ष नितीन राठोड यांनी बंजारा संस्कृती संवर्धन केंद्र उच्च दर्जाचे उभे करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांने पुढे यावे असे आवाहन केले.
प्रारंभी बंजारा संस्कृती संवर्धन केंद्राच्या समन्वयक सौ. सीमा वडते यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन प्रा. सुभाष चव्हाण यांनी केले. उपस्थितांचे आभार डॉ. सुनीता राठोड यांनी मानले. या बैठकीस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास चौधरी, मराठवाडा जनता विकास परिषद केंद्रीय कार्यकारणी सदस्य भरतभाऊ राठोड मांडवीकर, सौ. संध्याताई राठोड, सौ. सविता राठोड, विजय नाईक, शैलेश चव्हाण, के.एम. चव्हाण, एस. एन. जाधव, बी. आर. राठोड, संतोष राठोड, आर. टी. राठोड, रोहिदास पवार, दयाराम आडे, शंकर राठोड,
आदि उपस्थित होते.
1 टिप्पण्या
Dhanyawad 🌄
उत्तर द्याहटवा