हिरवे - घानवळ ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याची प्रचंड दुरावस्था...लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष.
मोखाडा प्रतिनिधी - रामदास गाडर
पालघर जिल्ह्यातील डहाणू - नाशिक हायवेच्या मोरचोंडीजवळून निघणारा हा रस्ता पुढे हिरवे - घाणवळ - बदलद्याच्यापाडामार्गे नाशिक जिल्ह्यातील हरसूलला जोडला जातो.सदरचा रस्ता हा मोखाड्यावरून हरसूलला पोहचविणारा कमी अंतराचा असल्यामुळे या अतिमहत्वाच्या आंतरजिल्हा रस्त्याला विशेष महत्व असून मोठ्याप्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ असते.
या कायम वर्दळ असणाऱ्या आंतरजिल्हा रस्त्यावर हिरवेगावापासून घानवळ पर्यंत असणाऱ्या 5 कि.मी.च्या रस्त्यावर अक्षरशः खड्यांचे साम्राज्य असून प्रवास्यांची प्रचंड गैरसोय होत आहे.परिणामी या रस्त्यावरून प्रवास्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
मागील वर्षाच्या दिवाळीत घानवळच्या घासतेल्याआंब्याच्या मोठ्या वळणात भाऊबीजकरिता हरसूलला निघालेल्या पती-पत्नी आणि लहान मुलगा यांची दुचाकी खडयात पडून अपघात झाला होता. या घटनेची दखल घेऊन घानवळ व जांभूळमाथा येथील गजानन टोपले यांच्या टीमने तरुणांसह श्रमदानातून रस्त्यावरील खड्डे बुजवून या रस्त्याने प्रवास करणाऱ्या भगिनींना भाऊबीजेची अनोखी भेट दिली होती.
आता पुन्हा हा रस्ता खड्डेमय झाला असल्याने गर्भवती महिला,पेशंट व जेष्ठ नागरिक यांना या रस्त्यावरून प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन खड्डेयुक्त रस्ता दुरुस्त करून प्रवास्यांची गैरसोय टाळावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
0 टिप्पण्या