एसटी बस उलटली; चालक वाहकासह दहा जण जखमी एक महिला अत्यवस्थ कुरुळी फाटा येथील घटना
प्रतिनिधी : योगेश ( विकास ) अल्हाट
चाकण : चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने पुणे-नाशिक महामार्गावर चाकण जवळील कूरळी फाटा येथे मंगळवारी (दि.24 ) दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान एसटी बस उलटली. सुदैवाने या अपघातात मोठी दुर्घटना टळली असून कोणतीही जीवित हानी झाली नाही.
या अपघातात चालक वाहका सह बसमधील चार महिला व चार पुरुष असे एकूण दहा जण जखमी झाले आहेत. यात एका महिलेची प्रकृती चिंताजनक असून जखमींवर चाकण येथे उपचार सुरू आहेत. ब्रेक निकामी , स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे एसटीचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
म्हाळुंगे इंगळे पोलिसांना या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर जखमींना तातडीने चाकण परिसरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमींची नावे मात्र सायंकाळी उशिरापर्यंत समजले नसून , त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक वृत्त असे की , पुणे नाशिक महामार्ग वरून कोपरगाव ते पुणे अशी आठ प्रवासी घेऊन एसटी बस क्रमांक (एम एच 40 क्यु . 6027 ) भरधाव जात होती.एसटी बस चाकण जवळील कुरुळी फाटा हद्दीत आली असता ब्रेक निकामी व स्टेअरिंग लॉक झाल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने बस भर रस्त्यात उलटली. सुदैवाने या अपघातात मोठी दुर्घटना टळली असून, एसटीच्या चालक वाहक यांच्यासह चार महिला व चार पुरुष असे एकूण दहा जण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी चाकण येथे दाखल करण्यात आले आहे.
या घटनेत एसटी बस खाली हात अडकून पडलेल्या एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी सांगितली. एस.टी. उलटल्याने महामार्ग वर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी काही वेळातच वाहतूक पूर्ववत केली.
कूरूळी फाटा हा परिसर वर्दळीचा असल्याने येथे रस्त्याने ये जा करणाऱ्यांची मोठी गर्दी असते. दुपारी महामार्गावर किरकोळ गर्दी होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. म्हाळुंगे पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
0 टिप्पण्या