समता दलाची बैठक संपन्न

 सोयगाव तालुक्यातील माळेगांव पिंप्री येथे समता सैनिक दलाची सभा संपन्न.



छत्रपती संभाजी नगर

दि : 6 एप्रिल 23 रोजी ही सभा आयोजित करण्यात आली होती. मराठवाड्यातील ऐतिहासिक औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वात टोकावर असलेल्या सोयगाव तालुक्यातील ग्रामीण भागात समता सैनिक दलाची सभा तेथील स्थानिक कार्यकर्ते आयु.शिवराम जाधव यांच्या पुढाकारामुळे व जळगाव जिल्हा प्रचारक आयु. किशोर डोंगरे यांच्या प्रयत्नांमुळे यशस्वीरीत्या संपन्न झाली.


महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संघटना आपल्या मातृसंघटना आहेत.


अनेक स्वयंघोषित पुढाऱ्यांनी बाबासाहेबांचे नाव घेवून स्वतःच्या संघटना उभारून आंबेडकरी शक्ती मध्ये फूट पाडली आहे. 

दिल्लीपासून ते गल्ली पर्यंत असे फूट पाडणारे पुढारी निर्माण झाल्यामुळे आंबेडकरी विचारांची एकसंघ ताकद देशात निर्माण होवू शकली नाही.

सातत्याने वेगवेगळ्या संघटना निर्माण झाल्यामुळे जास्तीत जास्त फुटीची आणि असंघटितपणाची परिस्थिती निर्माण झाली आहे.जनतेने बाबासाहेबांच्या संघर्षाची , त्यागाची आणि प्रचंड उपकारांची जाणिव ठेवून त्यांनी निर्माण केलेल्या संघटनांना उभे करण्यासाठी पाठबळ दिले पाहिजे असे आवाहन केंद्रीय प्रचारक मा. धर्मभुषण बागुल यांनी यावेळी केले.

 परमपूज्य बाबासाहेबांना बाप मानत असाल तर त्यांचे विचार देखील समजून घेतले पाहिजे.आणि त्यांनी स्थापन केलेल्या संघटनाचे काम केले पाहिजे.


महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी  मानवतावादी , कल्याणकारी तत्वज्ञान देशाला दिले आहेत. देशाच्या हितासाठी 28 मुद्द्यांचा कार्यक्रम दिला आहे.त्यावर लक्ष केंद्रित करून समता सैनिक दलाची वाटचाल सुरू आहे.सर्व महाराष्ट्रात आम्ही प्रचार करून दलाची अभेद्य अशी शक्ती उभारणार आहोत.

यासाठी प्रामाणिक , निष्ठावान , निस्वार्थी ,सक्रिय लोकांची आवश्यकता आहे. अशा खऱ्या कार्यकर्त्यांना तयार करण्याचे काम समता सैनिक दल करीत आहे.उपस्थित लोकांनी , महिलांनी देखील आमच्या कार्यात सामील व्हावे असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले.

सोयगाव परिसरातील अनेक गावातील सुज्ञ व तळमळ असलेली जाणकार मंडळी यावेळी उपस्थित होते. सर्व उपस्थित बंधू भगिनींनी दलात प्रवेश घेत असल्याचे जाहीर केले.

या कार्यक्रमासाठी चाळीसगाव येथील ज्येष्ठ सैनिक आयु.महेंद्रभाऊ जाधव , तालुका प्रचारक नितीन मरसाळे , बाबा पगारे हे उपस्थित होते.

सोयगाव तालुका प्रचारक म्हणून आयु.शिवराम जाधव यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

लवकरच सोयगाव येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात येईल असे  त्यांनी त्यावेळी जाहीर केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या