लभान बंजारा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न - केंद्रीय पंचायत राज मंत्री मा. कपिल पाटील
प्रतिनिधी
लभान बंजारा समाजाला भेडसावत असलेल्या विविध समस्या व रोजगारा नसल्यामुळे हवालदिल झालेल्या समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी लभान बंजारा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. उत्तमदादा म्हस्के तसेच भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मा. सुंदर डांगे यांनी केंद्रीय पंचायत राज मंत्री मा. ना. कपिल पाटील यांची भेट घेतली.
लभान बंजारा समाजाच्या वतिने मंत्रीपद मिळाल्याबद्दल केंद्रीय मंत्री मा. ना. कपिल पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
लभान बंजारा समाज हा भारतभर विखुरलेला असुन समाजाला विविध राज्यात विविध आरक्षण देण्यात येते, परंतु समाजाला जातीचे दाखले मिळविण्यासाठी खूप अडचणी येतात त्यामुळे समाजातील विद्यार्थी ईच्छा असून ही उच्च शिक्षणापासून लांब राहतात तसेच अशिक्षित असल्यामुळे मोलमजूरी करून उदरनिर्वाह करावा लागत असल्याने समाजासाठी सरकारमार्फत सर्वेक्षण करून त्यांचे रोजगार व शिक्षणासाठी ठोस उपाययोजना करण्यात यावी अशी विनंती लभान बंजारा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. उत्तमदादा म्हस्के यांनी केली.
लभान बंजारा समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात सामावून घ्यायचे असेल तर श्रम मंत्रालय व पंचायत राज मंत्रालय यांनी मिळून समाजासाठी योजना आखणे गरजेचे आहे असे तसेच विकास कामात लभान बंजारा समाजाला प्राधान्य देऊन सरकार समाजाला सन्मानाने जगण्याची संधी देऊ शकते असे मत भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मा. सुंदर डांगे व्यक्त केले.
सर्वांना सोबत घेऊन देशाचा सर्वांगीण विकास करणे हे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे, लभान बंजारा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही याप्रसंगी केंद्रीय पंचायत राज मंत्री मा. ना. कपिल पाटील यांनी दिली. माझ्या मंत्रालयाच्या माध्यमातून काय योजना राबवता येईल का यावर अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिले. लभान बंजारा समाजाचे शिष्टमंडळ घेऊन मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिले. याप्रसंगी लभान बंजारा समाजाचे कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या