शिक्षणाचा सेतू कोसळला?
पालघर प्रतिनिधी : हेमंत घाटाळ
कोरोनामुळे गेलं संपूर्ण वर्ष संभ्रमावस्थेत गेलं. 'शाळा बंद पण शिक्षण सुरु' अशी घोषणा शिक्षण विभागाने केली. कोरोना जाईल याकडे आपण सारेजण नजर लावून बसलो आहोत. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार कोरोना लवकर पाठ सोडेल अशी चिन्हे आजतरी दिसत नाहीत.
शिक्षण विभाग यावर्षी एक्टिव्ह मोडवर आल्यासारखा दिसला. गेल्या वर्षभरात शिक्षणाचा पडलेला खंड भरुन काढण्यासाठी सेतू नावाचा ४५ दिवसांचा ब्रिज कोर्स शाळांसाठी तयार केला गेला आहे. गोंधळाशिवाय सुरुवात नाही असे चित्र नेहमीच दिसते. सेतु अभ्यासक्रम केवळ मराठी व उर्दू माध्यमासाठीच तयार केला गेला. हिंदी, इंग्रजी व इतर भाषांमधील मुलांसाठीचा ब्रिज कोर्स तयार करण्यात आला नाही. इतर भाषांमध्ये शिकत असलेली मुले सावत्र आईची आहेत का? त्यांना सेतू अभ्यासक्रमाची गरज नव्हती का? एससीआरटीकडे मनुष्यबळाची की इच्छाशक्तिची कमी होती? मराठी शाळा या मोठ्या प्रमाणावर सेमी इंग्रजी झालेल्या आहेत याचीही माहिती शिक्षण विभागाकडे नव्हती का? आज निम्मे दिवस संपल्यानंतर सेमी इंग्रजीच्या मुलांना पिडीएफ पाठवल्या गेल्या आहेत. नियोजनशुन्य कारभाराचं अजून कोणतं उदाहरण असेल?
हा सेतू अभ्यासक्रम प्रवाहात नसणार्या मुलांना प्रवाहात येताना मागील वर्षीच्या महत्वाच्या भागाची ओळख व्हावी या चांगल्या हेतूने सुरु केलेला असेल असे वाटते. प्रवाहात नसणारी मुले यावर्षी शाळेत येतील या गृहितकावर हा अभ्यासक्रम सुरु केलेला होता. हा अभ्यासक्रम वर्गातील प्रत्यक्ष अध्यापनावर आधारित आहे. त्यामुळे ऑनलाईनवर कृतिशील अभ्यासक्रम शिकविणे जिकिरीचे होत आहे. ते शक्य नाही. शहरात तर मुलांना ऑफलाइन शिकविले जाऊ शकत नाही. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
यावर्षी शालेय पुस्तके अद्यापही शाळेत पोहोचलेली नाहीत. गेल्यावर्षीची पुस्तके शाळेत जमा करुन नवीन वर्गांना वितरीत करायला सांगितली होती. परिणामी आज मुलांकडे मागील वर्षाची पुस्तके नाहीत. सेतुमधे मागिल वर्षीची कविता वाचा किंवा धडा वाचून कृती करा, असे प्रश्न विचारले गेले आहेत. त्यामुळे पुस्तकेच मुलांकडे नसल्यामुळे कृती सुटणार कशा? हा ही विचार शिक्षण विभागाच्या मनात आला नाही का? सगळा आनंदी आनंद सुरु आहे. यात भरडला जात आहे तो मात्र शिक्षक ! तो नोंदी ठेवता- ठेवता मेटाकुटीला आला आहे.
गेल्यावर्षी शाळेत नसणारी मुले यावर्षीही शाळेत हजर नाहीत. जी नव्याने हजर झालीत ती सेतूला पाहून परत पळून गेली आहेत. ही वस्तूस्थिती आहे. रोज सहा विषयांच्या सहा कृतीपत्रिका मुलांनी सोडवायच्या आहेत. यासाठी शिक्षकांसहीत , पालक अथवा अन्य सहाध्यायांची मदत घ्यावयाची आहे. शिवाय ऑनलाईन क्लासही अटेंड करायचे आहेत. त्या पिडिएफ च्या झेरॉक्स काढायच्या अथवा प्रत्येक विषयाची कृतिपत्रिका वहीत सोडवायची आहे. ऑनलाईन क्लास अटेन्ड करणे व रोजच्या कृतिपत्रिका सोडवणे या जाचाला कंटाळून जूनमध्ये वाढलेली विद्यार्थी संख्या जुलैमध्ये आपोआप कमी झाली . ज्या विद्यार्थ्यांना गेले वर्षभर ऑनलाइन, ऑफलाइन शिक्षण घेता आले त्याच विद्यार्थ्यांना आज सेतूचा अभ्यास करावा लागत आहे. यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचा वेळ व श्रम वाया जात आहेत. या कृतिपत्रिकांच्या संदर्भातही अनेक तक्रारी आहेत. शिक्षक, विद्यार्थ्यांच्या कृतिपत्रिका गोळा करता - करता व त्यांच्या नोंदी ठेवता - ठेवता बेजार झालेले आहेत. दिवसभर मुलांच्या मागे लागलेले आहेत. शिकलेल्या विद्यार्थ्यांनाच जूना अभ्यासक्रम शिकून परीक्षा द्यावी लागत आहे . जे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर आहे त्यांच्यासाठी सेतूचा उपयोगच काही नाही . शिवाय पंचेचाळीस दिवसांमध्ये तीन परीक्षा व जवळपास अठरा पेपर विद्यार्थ्यांना सोडवायचे आहेत . यामुळे मुलांवर, शिक्षकांवर व पालकांवर प्रचंड तणाव निर्माण झालेला आहे. आजही ४०% मुलांकडे मोबाईल, नेट यासारखी साधनं नाहीत. त्यांच्या शिक्षणावर शिक्षण विभाग व सरकारही गप्प आहे. लाखो मुले शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर आहे. सेतु सारखा अभ्यासक्रम राबवताना शिक्षण विभागानेही भेदभाव केलेला आहे.
हिंदी, इंग्रजी, गुजराती व इतर माध्यमाच्या मुलांची नव्या इयत्तेच्या अभ्यासक्रमाची प्रथम घटक चाचणी परीक्षेची तयारी सुरू झालेली आहे. या मुलांचा नवीन इयत्तांचा किमान पंचवीस टक्के घटक शिकवून झालेला आहे. शिक्षण विभागाने विना मागणी पून्हा एकदा अभ्यासक्रम कमी केला आहे. शिक्षण विभागाने उदात्त हेतूने तयार केलेला सेतु अभ्यासक्रम कोसळला आहे का? याचा विचार करावा लागणार आहे. आजही मुलांना शालेय पुस्तके मिळालेली नाहीत.
शिक्षण विभागात निम्म्यापेक्षा जास्त संचालकांची, उपसंचालकांची व शिक्षण निरीक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे यंत्रणेवरचा ताण प्रचंड वाढलेला आहे. अनेक अधिकारी अतिरिक्त कार्यभार संभाळत आहेत. कोणत्याही बाबी वेळेत होत नाही शिक्षणखाते रामभरोसे सुरु आहे. शिक्षण विभागात ताळमेळ दिसून येत नाही. किमान ९० हजार शिक्षकांची कमतरता आहे. संचमान्येतेचे निकष बदलून, आहे त्या उपलब्ध शिक्षकांवरच काम चालविण्याचे शासनाचे धोरण दिसते आहे. दिल्ली सारख्या राज्याच्या राजकीय अजेंडावर शिक्षण विषय आहे. महाराष्ट्रात मात्र शिक्षणाचा क्रमांक शेवटचा आहे.
शिक्षण विभागाने कात टाकायला हवी. नवीन शैक्षणिक धोरणाचं काय करणार? याचं कोणतंही उत्तर सरकारकडे नाही. केवळ काही अधिकार्यांच्या मर्जीवर शिक्षण खाते चालणे धोकादायक आहे. गरज आहे ती शिक्षण विभागात कणखर निर्णय घेण्याची! सेतु अभ्यासक्रम शिक्षणाला पूरक होण्याऐवजी अपकारक तर ठरत नाही ना? याचं अवलोकन होणे गरजेचे आहे. मुलं ऑनलाईन,ऑफलाईन शाळेत कशी येतील याकडे शिक्षण विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. केवळ दाखविण्यासाठी काहीतरी करण्याऐवजी मुलांच्या भविष्याला पुरक ठरेल व चिरकाल टिकेल असं धोरण आखणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांवर प्रयोग करणे थांबवायला हवं. जाणिवपूर्वक व नियोजनपूर्वक शिक्षणाचं धोरण आखायला हवं. कोणत्याही विपरीत परिस्थितीत शिक्षणव्यवस्था कोलमडायला नको. त्यासाठी गरज आहे प्रबळ इच्छाशक्ती व बेधडक निर्णय घेण्याची. तरंच शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता राखली जाईल आणि शिक्षणाचा सेतू कोसळला जाणार नाही. नावाप्रमाणे सेतू हा सांधण्यासाठी असतो मात्र इथे शिक्षण आणि परिस्थिती यांचा मेळ घालण्यात कुठेतरी उणीव आहे की काय याचे पुनरावलोकन करणे गरजेचे आहे, आता वेळ येऊन ठेपली आहे ठोस निर्णयाची आणि अचूक धोरणाची! तरच हे सेतूबंधन वाचविणे शक्य होईल!!
जालिंदर देवराम सरोदे
प्रमुख कार्यवाह शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य.
अध्यक्ष- मुंबई ग्रॅज्युएट फोरम.
3 टिप्पण्या
Very true
उत्तर द्याहटवाअगदी वास्तव sir
उत्तर द्याहटवासर, कोणतंही राष्ट्र असो समाज वा कुटुंब हे त्यातील घटकांच्या सकस शिक्षण व्यवस्थेच्या आधारेच सर्वंकषरित्या सिद्ध झालेलं आहे. प्रगत महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेचा वारू ठोस कृतिकार्यक्रमाशिवाय ऐन मध्यावर भरकटल्याचं व येत्या काळात होणाऱ्या अपरिमित शैक्षणिक वाताहतीचं यथार्थ दर्शन आपण आपल्या सूक्ष्म भूमिकेतून व्यक्त केले. आपले मनःपूर्वक आभार व अभिनंदन...
उत्तर द्याहटवाप्रस्तुत सेतू अभ्यासक्रमाच्या संरचनेवेळी शिक्षण विभागाने सकारात्मक परिणामकते बरोबरच अनाहुतपणे वाढीव नकारात्मक बाजूची व विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व मानसिक क्षमतांची चाचपणी करणं नक्कीच अपेक्षित होतं, हे आपण विस्तृतरित्या सिद्ध केलं आहे...
शिक्षण ही दुरगामी सुप्त ध्येय-उद्दिष्टांसह अव्याहत व नैसर्गिक, आनंददायी प्रक्रिया आग्रहाने राहावी, यासाठी आपल्या सूचनांचा संवेदनशीलतेने विचार शिक्षण धुरीनाकडून नक्कीच होईल अशी आशा बाळगूया....
आगामी लेखास मनःपूर्वक शुभेच्छा....