गुजरात अंबुजा एक्स्पोर्ट प्रा.लि. या कंपनीच्या प्रस्तावित डीस्टलरी प्रकल्प आणि ४ मेगावॉट औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या दि.२१ मे रोजी होणाऱ्या लोकसुनावणीबाबत
जाहीर आवाहन
जनतेचा आवाज हाच माझा आवाज ...
चाळीसगाव MIDC येथील गुजरात अंबुजा एक्स्पोर्ट प्रा.लि. या कंपनीच्या प्रस्तावित एक्स्ट्रा न्युट्रल अल्कोहोल – १२० किलो प्रति लिटर प्रति दिवस क्षमता मका स्टार्च वर आधारित डीस्टलरी प्रकल्प आणि ४ मेगावॉट औष्णिक विद्युत प्रकल्प संदर्भात दि.२१ मे २०२१ रोजी मा.जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या कार्यालयात लोकसुनावणी (पब्लिक हियरिंग) ऑनलाईन स्वरूपात आयोजित केले आहे. सर्वत्र कोरोनाच्या प्रादुर्भावाने जनता त्रस्त असताना एका प्रदूषण करणाऱ्या व जनतेचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या उद्योगाच्या संदर्भात ऑनलाईन लोकसुनावणी (पब्लिक हियरिंग) घेणे हे अन्यायकारक आहे. सदर गुजरात अंबुजा एक्स्पोर्ट प्रा.लि. कंपनीसंदर्भातील ऑनलाईन लोकसुनावणी (पब्लिक हियरिंग) तात्काळ स्थगित करून ती कोरोना प्रादुर्भाव संपल्यानंतर घ्यावी व प्रत्यक्ष जनतेचे काय म्हणणे आहे ते समजून घ्यावे, तरच लोकसुनावणीचा उद्देश साध्य होईल असे मी काल दि.१९ मे रोजी पत्राच्या माध्यमातून मा.उप प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जळगाव व इतर वरिष्ठांकडे मागणी केली होती मात्र त्यांनी तांत्रिक कारण दाखवत दि.२१ मे रोजीच लोकसुनावणी घेण्यात येणार असल्याचे मला कळविले आहे.
सदर गुजरात अंबुजा एक्स्पोर्ट प्रा.लि. कंपनीच्या सद्यस्थितीत त्याचठिकाणी सुरु असलेल्या प्लांटमधून निघणाऱ्या दुर्गंधीयुक्त वासामुळे चाळीसगाव शहरासह परिसरातील खडकी बु. व अनेक गावांच्या जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच प्लांटच्या आजूबाजूची शेतजमिनी देखील प्रदूषित झाल्याने नापीक झाल्या आहेत व विहिरीतील पाणी देखील प्रदूषित झाल्याने त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या, जनावरांच्या व पिकांच्या आरोग्यास धोकेदायक ठरत आहे. तसेच या कंपनीमध्ये सदर उद्योजक हे स्थानिकांना रोजगार देत नाहीत.
यासंदर्भात संबंधित खडकी बु. गावातील ग्रामपंचायत, विविध सामाजिक - राजकीय संघटना यांनी वेळोवेळी शासनाकडे व कंपनी प्रशासनाकडे निवेदने दिली आहेत.
तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने माझ्याकडे देखील कंपनी तुन होणाऱ्या प्रदूषणासंदर्भात व सदर कंपनीमध्ये स्थानिकांना रोजगार मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असता मी देखील याबाबत मा.पर्यावरण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे, त्यानुसार मा.पर्यावरण मंत्री यांनी चौकशीचे आदेश दिले असून चौकशी सुरू आहे.
अशी सर्व परिस्थिती असताना एक लोकप्रतिनिधी म्हणून मी माझी प्रामाणिक भूमिका आपल्यापुढे मांडत आहे. आपल्या चाळीसगाव येथे उद्योग यावेत, त्यामाध्यमातून रोजगार निर्माण व्हावा या मताचा मी आहे. मात्र सदर उद्योगाच्या माध्यमातून जर जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असेल तर मी नेहमीच जनतेच्या बाजूनेच उभा राहीन. मागील वर्षभरापूर्वी चाळीसगाव MIDC येथे कत्तलखान्याचे काम सुरु झाले होते. त्यामाध्यमातून होणारे प्रदूषण, चाळीसगाव वासीयांच्या तीव्र भावना लक्षात घेत मी स्वतः त्या कत्तलखान्याला विरोध केला व त्याचे काम बंद पाडले.
मी लोकप्रतिनिधी असल्याने जनता जे ठरवेल ते मला मान्य असेल. माझा कुठलाही वैयक्तिक स्वार्थ न ठेवता जनतेचे हित यालाच माझें प्राधान्य राहील.
तरी माझे सर्वाना विनम्र आवाहन आहे की, उद्या दि.२१ मे रोजी सकाळी ११ वाजता मा.जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या ऑनलाईन लोकसुनावणी मध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, प्रकल्पाच्या संदर्भात आपल्या ज्या काही समस्या असतील, म्हणणे असेल ते मांडावे. जनतेचे या प्रकल्पाविषयी काय मत आहे हे मला देखील कळायला हवे. सदर नवीन प्रकल्पाच्या संदर्भात जो काही निर्णय जनता घेईल तो मला पूर्णपणे मान्य राहील. जनतेने प्रकल्पाला समर्थन दिले तर माझे देखील समर्थन राहील आणि जनतेने जर विरोध केला तर माझा देखील विरोध राहील. जनतेचा आवाज हाच माझा आवाज.!!!
ऑनलाईन लोकसुनावणी साठी झूम लिंक
या एपवर खालील मिटिंग आयडी वापरावा
आपला विश्वासू,
आमदार मंगेश रमेश चव्हाण
0 टिप्पण्या