चाकण येथे सशस्त्र दरोडा प्रतिकार करणाऱ्या दांपत्याला चाकूने भोकसले

 बहुळ गावात सशस्त्र दरोडा प्रतिकार करणाऱ्या दांपत्याला चाकूने भोकसले.



पुणे प्रतिनिधी :  योगेश आल्हाट 

चाकण : खेड तालुक्यातील बहुळ गावात मध्यरात्री दरोडेखोरांनी धुमाकूळ घालून एका कुटुंबाला चाकूच्या धाकावर ओलीस धरले. वृद्धांना धमकावून दागिने व रोकड लुटल्यानंतर, तरुण दांपत्यांनी प्रतिकार करताच चोरट्याने त्यांच्यावर थेट चाकूने जीवघेणा हल्ला केला. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जय राम लक्ष्मण वाडेकर (वय 67 )हे आपल्या कुटुंबासोबत बहुळ गावातील फुलसुंदर वस्ती येथे राहतात. त्यांच्या कुटुंबात पत्नी शालन ,(वय 65), मुलगा अशोक (वय 35 ), सून उज्वला (वय 32), आणि दोन लहान नातवंडे आहेत. जयराम वाडेकर शेती करतात. तर त्यांचा मुलगा अशोक सणसवाडी येथे एका कंपनीत नोकरी करतो.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि 23) अशोक आणि उज्वला हे शिवनेरी येथे दर्शनासाठी गेले होते. रात्री दहा वाजता घरी परतल्यानंतर कुटुंब जेवण करून झोपले. मध्य रात्री अचानक पाच ते सहा चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. झोपलेल्या जयराम वाडेकर यांना अचानक पत्र्याचे पेटीचा आवाज आल्याने जाग आली. त्यांनी पाहिले असता वीस ते पंचवीस वयोगटातील एक दरोडेखोर हातात चाकू घेऊन त्यांच्याजवळ बसला होता. "गप्प रहा नाहीतर चाकू भोकासतो" अशी धमकी दिली. चोरट्याने शालन वाडेकर यांच्या अंगावरील दागिने हिसकाविले.

मुलगा आणि सुनेला चाकूने भोकसले

जयराम आणि शालन यांच्या अंगावरील दागिने काढून घेतल्यावर, त्यांनी आपला मोर्चा अशोक आणि उज्वला यांच्या बेडरूम कडे वळविला. त्यांनी त्यांच्याही बेडरूमचा दरवाजा तोडत आत प्रवेश केला .आवाजामुळे अशोक आणि उज्वला यांना जाग आली. त्यांनी दरोडेखोरांना प्रतिकार करताच चोरट्याने दोघांच्या पोटात थेट चाकू भोकसला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दांपत्याने मदतीसाठी आरडाओरड केली. त्यावेळी शालन वाडेकर यांनी मुलाला व सुनेला वाचवण्यासाठी बेडरूम मध्ये धाव घेतली. असता त्यांच्यावर जोरदार काठीचा प्रहार केला. त्यात त्याही जखमी झाल्या.

यामध्ये चोरट्यांनी एक लाख बत्तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि बारा हजार रुपये रोख रक्कम लंपास केली आहे. त्यानंतर चोरटे पळून गेले. जाताना त्यांनी घराची बाहेरून कडी लावून घेतली .

गावात भीतीचे वातावरण 

या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच चाकण पोलिसांसह पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दरोडेखोरांच्या शोधासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या