नाशिक (जिल्हा माहिती कार्यालय): राज्यात मुद्रांक शुल्क चुकविणाऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या अभय योजनेच्या दुसऱ्या टप्प्यास 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच ही मुदतवाढ देताना आता महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास महामंडळ (म्हाडा), शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (सिडको), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), महानगरपालिका, नगरपंचायतीच्या जागांवर विकसित झालेल्या इमारतींमधील रहिवाशांनाही योजना लागू करण्याचाही निर्णय शासनाने जाहीर केला आहे, असे सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.



राज्य शासनाने आतापर्यंत 1980 ते 2000 या दरम्यान चुकविलेला मुद्रांक शुल्क भरणाऱ्‍यांसाठी अभय योजना सन 2023 लागू करण्यात आली आहे. ही योजना 1 डिसेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024 आणि 1 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 या दोन टप्प्यात राबविण्याचा शासनाने निर्णय घेतलेला होता.

 31 मार्चनंतर या योजनेला 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर योजनेचा कालावधी 30 जूनला संपुष्टात आल्याने राज्यशासनाने या योजनेला पुन्हा 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तरी या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे.