अन् मुख्यमंत्र्यांच्या दालनाच्या पाटीवर आलं आईचं नाव...

 अन् मुख्यमंत्र्यांच्या दालनाच्या पाटीवर आलं आईचं नाव...



मुंबई, दि. १३: मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेरील पाटी आज सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. वडिलांच्या नावासोबत आईचे नाव लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेत दालनाबाहेर *एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे* अशी पाटी लावली आहे. 


यापुढे शासकीय दस्तऐवजावर वडिलांसोबत आईचे नाव लिहिणे देखील बंधनकारक करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता.या निर्णयाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी स्वतःपासून करायची असे ठरवले होते. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार आजपासून त्यांच्या मंत्रालयीन दालनाबाहेर लिहिलेल्या नावात बदल करण्यात आला असून ते 'एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे' असे करण्यात आले आहे.


माणसाला जन्म देण्यापासून त्याला मोठे करून स्वतःच्या पायावर उभे करण्यात वडिलांचा बरोबरीने आईचा देखील तेवढाच वाटा असतो. तिचं श्रेय तिला मिळावे यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. समाजात वडिलांएवढेच आईचे महत्त्व देखील अधोरेखित व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून त्यांची अंमलबजावणी आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः सुरु केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या