कापसाला बाजारात मिळणारा कमी भाव लक्षात घेता आज भोरस (चाळीसगाव) जवळील सत्यम जिनिंग येथे मार्फत शासकीय हमीभावाने कापूस खरेदी केंद्र उद्घाटन माझ्याहस्ते करण्यात आले. यावेळी वजनकाटा पूजन व आलेल्या शेतकरी बांधवांचा सत्कार केला.
उद्घाटन प्रसंगी जिल्हा दूध संघाचे संचालक तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रोहित निकम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कपिल शिवाजीराव पाटील, उपसभापती साहेबराव बाबु राठोड, बाजार समितीचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ, बाजार समितीचे सचिव, सहाय्यक सचिव, सीसीआय अधिकारी व बाजार समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सी. सी.आय.मार्फत कापूस खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या परवानगींची अडचण येत होती, त्यामुळे सी.सी.आय.चे कापूस खरेदी सुरू करण्यासाठी उशीर होत होता. ही अडचण लक्षात घेता मी व बाजार समितीने पाठपुरावा करून ज्या आवश्यक परवानगी असतील त्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे सी.सी.आयच्या कापूस खरेदीमध्ये येणारी अडचण दूर झाली .त्यामुळे सी.सी.आयचे कापूस खरेदी केंद्र शेतकऱ्यांच्या सेवेत सुरू होऊ शकले.
भारतीय कपास निगम लिमिटेड (सी.सी.आय) मार्फत कापूस खरेदी ही प्रथम सत्यम जिनिंग भोरस, येथे सुरू करण्यात आली आहे, त्यानंतर यश जिनिंग अँड प्रेसिंग तळेगाव, तसेच उमंग व्हाईट गोल्ड येथे सुरू होणार आहे. कापूस विक्रीकरिता शेतकरी बांधवांसाठी रजिस्ट्रेशन करण्याचे काम सत्यम जिनिंग भोरस येथे सुरु आहे, रजिस्ट्रेशनसाठी काही अडचण असल्यास बाजार समिती कर्मचारी श्री.विरेंद्र पवार यांच्याशी संपर्क करावा. शेतकरी बांधवांना कापूस विक्रीसाठी खालील कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे.
१)अपडेटेड आधार कार्ड (आपले आधार कार्ड मोबाईल आणि बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे )
२)वर्ष २०२३-२४ चा सातबारा, यामध्ये कापूस पिकाची नोंद असणे आवश्यक आहे .(पिक पेरा )
३)कापूस विक्री वेळी शेतकऱ्यांना स्वतः हजर राहावे लागेल .
४)कापूस विक्रीवेळी आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर सोबत असणे आवश्यक आहे. ५)शेतकऱ्याने सी.सी.आयला विकलेल्या कापसाची रक्कम ३ ते ४ दिवसांमध्ये आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होईल.
६)प्रत्येक कागदपत्रे जसे की आधार कार्ड, सातबारा (पिकपेरा) व ओळखपत्र शेतकऱ्याने सेल्फ ॲटेस्टेड करून द्यावे.
७)सी.सी.आयला कापूस विकायच्या आधी खरेदी केंद्रावर येऊन रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे.
८)१ एकरला १२ क्विंटल कापसाची उत्पादकता ग्राह्य धरून कापूस खरेदी केल्या जाईल
९) शेतकऱ्याकडून ८ ते १२ टक्के आर्द्रता असलेला कापूस खरेदी केला जाईल. ८ ते १२ टक्के आर्द्रता असेल तर प्रत्येक १ टक्का आर्द्रतासाठी किमान आधारभूत दरानुसार (हमीभाव )१ टक्का कमी केला जाईल.
तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सत्यम जिनिंग भोरस येथे अगोदर नाव नोंदणी करावी असे आवाहन यावेळी केले.


0 टिप्पण्या